अथ चन्द्रकवचम्
श्रीचंद्रकवचस्तोत्रमंत्रस्य गौतम ऋषिः I अनुष्टुप् छंदः I
चंद्रो देवता I चन्द्रप्रीत्यर्थं जपे विनियोगः I
समं चतुर्भुजं वन्दे केयूरमुकुटोज्ज्वलम् I
वासुदेवस्य नयनं शंकरस्य च भूषणम् II १ II
एवं ध्यात्वा जपेन्नित्यं शशिनः कवचं शुभम् I
शशी पातु शिरोदेशं भालं पातु कलानिधिः II २ II
चक्षुषी चन्द्रमाः पातु श्रुती पातु निशापतिः I
प्राणं क्षपाकरः पातु मुखं कुमुदबांधवः II ३ II
पातु कण्ठं च मे सोमः स्कंधौ जैवा तृकस्तथा I
करौ सुधाकरः पातु वक्षः पातु निशाकरः II ४ II
हृदयं पातु मे चंद्रो नाभिं शंकरभूषणः I
मध्यं पातु सुरश्रेष्ठः कटिं पातु सुधाकरः II ५ II
ऊरू तारापतिः पातु मृगांको जानुनी सदा I
अब्धिजः पातु मे जंघे पातु पादौ विधुः सदा II ६ II
सर्वाण्यन्यानि चांगानि पातु चन्द्रोSखिलं वपुः I
एतद्धि कवचं दिव्यं भुक्ति मुक्ति प्रदायकम् II
यः पठेच्छरुणुयाद्वापि सर्वत्र विजयी भवेत् II ७ II
II इति श्रीब्रह्मयामले चंद्रकवचं संपूर्णम् II
चंद्रकवच पठण कोणी , कधी करावे
1. आपल्या जन्मपत्रिकेमध्ये चंद्र अशुभ असेल तर या कवचाचे नियमित पठण करावे.
2. चंद्र हा मंगल, शनी, राहू, केतू वा हर्शल यांनी युक्त किंवा दृष्ट असेल, अशुभ नक्षत्रांत (शनी, मंगळाची नक्षत्रे व आश्लेषा वा मूळ या नक्षत्रांत) असेल तर हे कवच रोज म्हणावे\ऐकावे.
3. भक्तीभावाने पठण केले तर पीडा नाश पावते व सर्व प्रकारच्या सुखांचा लाभ होतो.
4. चंद्र हा मनाचा कारक आहे. चंचल मनोवृत्तीच्या लोकांनी , घाबरट लोकांनी , मनोरुग्ण रोग्यांना , सतत टेन्शन आणि ताण-तणावात राहणार्त्यांना ह्या कवचाच्या पठाणाने निश्चित लाभ होतो.
5. साडेसाती असताना माणसाचे मन नैराश्याने ग्रासले जाते. आपल्याला आजूबाजूच्या माणसांची खरी रूपे या काळात परमेश्वर दाखवत असतो. मात्र कमकुवत / सौवेदनशील मनाला हे सहन होत नाही. तरी अशा वेळेस देखील या कवचाच्या पठणाने लाभ होतो.
6. प्रेम प्रकरणात आपली छबी इतरांना मोहून टाकण्यासारखी असावी म्हणून चंद्र कवच उत्तम फळे देते.
आईचे प्रेम , आशीर्वाद मिळावेत यासाठी चंद्रकवच उपयुक्त ठरते.
7. नवीन वास्तू व्हावी यासाठी देखील हा उपाय अचूक लागू पडतो.
चंद्र कवच वाचण्यापूर्वी हे जरूर वाचा :
१. सर्व उपाय वैयक्तिक पत्रिकेनुसार अचूक लागू ठरू शकतात.
२. आपल्याला एखाद्या उपायाचे फळ न मिळणे म्हणजे एखादे महान आणि परंपरागत शास्त्र फोल ठरते , असे नव्हे !
३. आपल्या नशिबात असते तितके , योग्य वेळी दैव आपणास देतेच . भलत्या गोष्टींच्या मोहापायी याचा पाठ करू नये.
४. आपल्या अंगी असणारी सात्त्विकता , परमेश्वरवरची श्रद्धा , पूर्वजन्मीचे संचित आणि या जन्मीची कर्मे साऱ्यांचा हिशोब होतो , आणि आयुष्याचा खेळ चालतो. आपण दैवाधीन आहोत ; हे ध्यानी असावे.
५. परमेश्वरास योग्य वाटेल त्या ठिकाणी तो यश देतो. त्याने योग्य तो मार्ग दाखवावा , आपले आयुष्य सुसह्य व्हावे यासाठी कर्म आणि नामस्मरण करत रहावे. कर्मास फळ देणे - न देणे परमेश्वरावर सोपवावे .
६. मनोभावे परमेश्वरास शरण जाऊन उपासना केल्यास भक्ती देवापर्यंत पोहोचते. अमुक कर - मी अमुक नवस फेडेन म्हणून देवाबरोबर सौदेबाजी करू नये . आपल्या देहातील प्रत्येक श्वासही त्यानेच दिला आहे ! त्याला देण्यासारखे आपल्याकडे भक्ती आणि प्रेमाखेरीज काय आहे ! - हा विचार अखंड मनी ठेवावा.
चंद्र कवचाचा मराठी अर्थः
या चंद्र कवचाचे गौतम नांवाचे ऋषि आहेत. या स्तोत्राचा अनुष्टुप हा छंद आहे. चंद्र ही या स्तोत्राची देवता आहे. चंद्रापासून होणार्या त्रासांतून सुटका होण्यासाठी याचा विनियोग करायचा आहे.
१) चतुर्भुज असलेल्या व मोराचे पीसांचा मुगुट धारण केलेल्या; वासुदेवाच्या नयनांचे व शंकरांच्या मस्तकाचे भूषण असलेल्या चंद्राचे मी ध्यान करतो आणि त्याला मी नमस्कार करतो.
२) अशाप्रकारे ध्यान करून मी शशी कवचाचा नेहमी जप करतो. शशी माझ्या शिराचे, कलानिधी माझ्या कपाळाचे रक्षण करो.
३) चंद्रमा माझ्या डोळ्यांचे, निशापति माझ्या कानांचे रक्षण करो. माझ्या प्राणाचे क्षपाकाराने आणि मुखाचे कुमुदबांधवाने रक्षण करावे.
४) सोमाने माझ्या कंठाचे, जैवातृकाने माझ्या स्कंधांचे, सुधाकराने माझ्या हातांचे आणि निशाकराने माझ्या स्तनांचे रक्षण करावे.
५) चंद्राने माझ्या हृदयाचे, शंकरभूषणाने माझ्या नाभीचे, सुरश्रेष्ठाने माझ्या मध्यागांचे आणि सुधाकराने माझ्या कमरेचे रक्षण करावे.
६) तारापतिने माझ्या ऊराचे, मृगांकाने माझ्या गुडघ्यांचे, अब्धजाने माझ्या जंघेचे आणि विधुने माझ्या पायांचे नेहमी रक्षण करावे.
७) उरलेल्या सर्व अंगाचे चंद्राने सर्वप्रकारे रक्षण करावे. असे हे दिव्य कवच भुक्ति व मुक्ति प्रदान करणारे असून जो याचे रोज पठण वा श्रवण करेल तो सर्वत्र विजयी होईल.
अशारीतीने ब्रह्मयामलांतील चंद्र कवच संपूर्ण झाले.
या कवचामध्ये चंद्राच्या निरनिराळ्या नावांनी चंद्राला संबोधून शरीराच्या सर्व अवयवांचे व सर्व भागांचे रक्षण करण्याची विनंती केली आहे. शशि, चंद्रमा, निशापति, क्षपाकर, कुमुदबांधव, सोम, जैवातृक, सुधाकर, निशाकर, शंकरभूषण, सूरश्रेष्ठ, तारापति, मृगांक, अब्धिज आणि विधु ही या कवचांत आलेली चंद्राची नांवे आहेत.
- गुरुदेव दत्त !
No comments:
Post a Comment
Your Queries / Suggestions most welcome!